सुख असावे फक्त एवढे
   

सुख असावे फक्त एवढे
स्वत्व आपले जपता यावे;
दुःख कितिही असो परंतु
त्या दुःखावर हसता यावे. 

वाट दूरची अवघड आणि
इथे तिथे मोहाची घसरण;
पडो कितीदा पण पडल्यावर
स्वतःला सावरता यावे.

जगण्या मरण्याच्या या वेळा
कधी कुणाच्या हाती होत्या;
जोवर आहे जीवन तोवर
जिवंत राहून जगता यावे.

- स्वप्नकळ्या - एल. के. कुलकर्णी